शास्त्रज्ञ बना ! इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित 'नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने संस्थेत तसेच अन्य संलग्न संस्थांमध्ये सायंटिस्ट 'बी' या पदांसाठी भरतीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

या पदांसाठी उमेदवार हे बीई/बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनियरिंग, बीई/बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक/बीई (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन) किंवा बीटेक/बीई (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन), एमएस्सी (फिजिक्स) किंवा एमएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स/अल्पाईड इलेक्ट्रॉनिक्स) विथ वन इअर ऑफ रिलेव्हन्ट एक्स्पीरिअन्स ही पात्रता धारण केलेले असावेत. विविध संस्था आणि संवर्ग मिळून एकूण 128 पदांसाठी ही भरती आहे. या पदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि दिव्यांग उमेदवांरासाठी काही पदे आरक्षित आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. 24 ऑक्टोबर, 2016 रोजी 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग उमेदवारांसाठी तसेच सरकारी नोकर, माजी सैनिक आणि अन्य विशेष संवर्गातील उमेदवारांसाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादा शिथिलक्षम आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला भारतात कुठेही सेवा करावी लागेल.

पदांचा तपशील, आवश्यक पात्रता, जागेची उपलब्धता, आरक्षण आणि अन्य बाबींसाठी उमेदवारांनी कृपया (1) meity.gov.in (2) cert-in.org.in (3) stqc.gov.in (4) ncs.gov.in (5) nielit.gov.in (6) ccdisabilities.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर, 2016 अशी आहे.

संस्थेचा पत्ता
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,
इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, 6, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड,
नवी दिल्ली – 110003.
दूरध्वनी क्र. (भारत)- 011-23644849,149

नवोदय विद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत समाविष्ट नवोदय विद्यालय समितीमध्ये सहायक आयुक्त, प्राचार्य, स्नातकोत्तर शिक्षक, प्रशिक्षित स्नातक शिक्षक तसेच तृतिय भाषा शिक्षकांच्या पदभरती प्रक्रियेकरीता पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून निवासी शाळेतील अनुभवी शिक्षकांस प्राधान्य आहे.

नवोदय विद्यालय समितीची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थांना मोफत आणि उत्तम शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने समितीस निरनिराळ्या सोयीसुविधांसाठी वेळोवेळी दिलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे आज देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातील नवोदय विद्यालय देशाचे आधारस्तंभ उभे करण्यात यशस्वी होत आहेत.

येथील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया काहिशी किचकट आहे कारण होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची निवड होत असल्यामुळे काठिण्य पातळी उच्च दर्जाची ! मात्र एकदा शिक्षक म्हणून रुजू झालात की मूलं आणि शिक्षक यांच्यात पुरातन गुरु शिष्य परंपरेची नव्याने प्रचिती आल्याशिवाय रहात नाही.

नवोदय विद्यालयात नोकरी करण्यासाठी बरेचदा दुर्गम भागात जाण्याची जिद्द आणि मानसिक तयारी ठेवावी लागते. मात्र मुलांबरोबर शिक्षकांकरीता सर्व सोयी उपलब्ध असतात. सुसज्ज निवास, उत्तम आणि पौष्टीक जेवण, फलाहार, खेळायला मोठे क्रीडांगण, शिकविण्यासाठी नवनवीन तंत्र, निरामय आरोग्यास पोषक वातावरणाबरोबरच शाळेत एक डिस्पेंसरी आणि प्रशिक्षित रुग्णसेविका या आणि अशा सर्व सुविधांमुळे मन सहज रमून जातं आणि समाजसेवेचं आत्मिक समाधानही लाभतं.

विविध पदांची वेतन श्रेणी आणि वयोमर्यादा, विषय निहाय पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत, वयोमर्यादेतील सवलत, फॉर्म फी मधील सवलत, परीक्षा पद्धती, परीक्षा केंद्र तथा इतर सर्व तपशीलवार माहितीकरीता उमेदवारांनी www.nvshq.org किंवा www.mecbse.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी.

ऑनलाइन अर्ज दिनांक 9 ऑक्टोबर 2016 (रात्रीचे 12 वाजता) पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. फॉर्म फी दिनांक 14.10.2016 पर्यंत स्वीकारली जाणार असून फॉर्म फी चलनाद्वारे बँकेत भरावयाची आहे. महिला उमेदवार तथा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांना फॉर्म फी मधून सवलत आहे. अर्ज फक्त ऑनलाइन भरून अर्जाची प्रिंट आणि कागदपत्रांच्या प्रती पुढील भरती प्रक्रियेकरिता स्वतः जवळ ठेवावयाच्या आहेत. तरीही संबंधीत पात्र उमेद्वारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या करिअर सोबत विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोने करावे याकरीता शुभेच्छा !

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती

भारत सरकारच्या अणु ऊर्जा विभागाच्या अखत्यारित 'न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' हा सार्वजनिक उपक्रम कार्यरत आहे. अणु ऊर्जा केंद्रासाठी संबंधित जागेची निवड, अणु ऊर्जा केंद्राची संकल्पना, बांधकाम, व्यवस्थापन, देखभाल, नुतनीकरण, दर्जावाढ, प्रकल्पाचा विस्तार, आदी विविध कार्ये या महामंडळामार्फत केली जातात.

या महामंडळात मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेन्टेशन ॲण्ड सिव्हिल या विषयातील पदवीधर अभियंत्यांकडून एक्झीक्युटीव्ह ट्रेनी या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी अर्जदारांनी गेट 2017 ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विस्तृत माहितीसाठी उमेदवारांनी कृपया http://www.gate.iitr.ernet.in या संकेतस्थळास भेट द्यावी. या महामंडळात काम करणे अत्यंत आव्हानात्मक आणि भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी आहे.

याच महामंडळात टेक्निकल ऑफिसर/डी, सायन्टिफिक ऑफिसर/सी, टेक्निकल ऑफिसर/सी, डेप्युटी मॅनेजर (फायनान्स ॲण्ड अकाऊंटस्), कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. टेक्निकल ऑफिसर/डी, सायन्टिफिक ऑफिसर/सी, टेक्निकल ऑफिसर/सी या तिन्ही पदांसाठी एकूण 43 जागा असून डेप्युटी मॅनेजर (फायनान्स ॲण्ड अकाऊंटस्), कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी प्रत्येकी 1 पद आहे. ही दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम आहे.

अधिक माहितीसाठी उमदेवारांनी कृपया www.npcilcareers.co.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

नेव्हल डॉकयार्डमध्ये 315 ॲप्रेन्टिसशीपच्या जागा

नेव्हल डॉकयार्ड, मुंबई कडून विविध संवर्गातील 315 ॲप्रेन्टिससाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. काही पदांचा कालावधी 1 वर्ष तर काही पदांचा कालावधी 2 वर्षे इतका आहे. 1 वर्ष कालावधी असलेल्या पदांची व रिक्त जागांची माहिती अशी : (1) मेकॅनिस्ट - 15 जागा (2) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिस्ट - 10 जागा, (3) फिटर - 40 जागा (4) मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स - 10 जागा (5) रेफ्रिजरेटर ॲण्ड एअरकन्डिशनिंग मेकॅनिक - 10 जागा (6) इलेक्ट्रोप्लेटर - 10 जागा (7) वेल्डर (गॅस ॲण्ड इलेक.) - 15 जागा (8) पेंटर (जनरल) - 10 जागा (9) मेसन (बीसी) - 15 जागा (10) ट्रेलर - 15 जागा (11) पॅटर्न मेकर - 15 जागा.

Click here for Recruitment Advt & Application Form
 
तर 2 वर्षे कालावधी असलेल्या पदांची व रिक्त जागांची माहिती अशी : (1) मेकॅनिक (डिझेल)-25 जागा (2) फाऊंड्री मॅन-05 जागा (3) मेकॅनिक रेडिओ ॲण्ड रेडर (एअरक्रॉफ्ट) - 15 जागा (4) पावर इलेक्ट्रिशियन - 15 जागा (5) शीपराईट स्टील - 15 जागा (6) प्लम्बर-20 जागा (7) पाईप फिटर-15 जागा (8) रिगर (हेव्ही इंडस्ट्रिज) - 10 जागा (9) शीट मेटल वर्क -10 जागा (10) क्रेन ऑपरेटर (ओव्हरहेड एसआय) - 10 जागा (11) शीपराईट वुड - 15 जागा.

या पदांसाठी उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2003 या कालावधीत झालेला असावा. केंद्र शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम आहे. या पदांसाठी उमेदवार हे किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित विषयातील आयटीआयची परीक्षा 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत.

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती, पासपोर्ट आकाराची 5 छायाचित्रे, पॅन आणि आधारकार्डाची प्रत आदी कागदपत्रे साधारण पोस्टाद्वारे पीओ बॉक्स नं. 10035 जीपीओ, मुंबई - 1 या पत्त्यावर दि. 14 ऑक्टोबर, 2016 पूर्वी मिळतील अशा बेताने पाठवावे. या पदासाठींची लेखी परीक्षा येत्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होण्याची शक्यता आहे.

नवी संधी : ग्रामविकास पदविका

भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायती राज' या संस्थेची स्थापना हैद्राबाद येथे करण्यात आली. केंद्र व विविध राज्य सरकारे, बँका, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उपक्रम, स्वयंसेवी संस्था आणि ग्राम विकासाशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, ग्राम विकासात संशोधन करणे, ग्रामीण भागाचा विकास करणे अशा विविध उद्दिष्टांसाठी ही संस्था कार्यरत आहे.

या संस्थेच्या वतीने नुकतीच एक वर्ष कालावधीच्या निवासी स्वरुपाच्या ग्रामीण विकास व्यवस्थापनातील पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करणारे उमेदवार हे कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. दि. 01 जानेवारी 2017 पूर्वी पदवी प्राप्त करु शकणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 असा आहे.

या अभ्यासक्रमासाठी दि. 06 नोव्हेंबर 2016 रोजी बंगळूरु, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, गोवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पटना, पुणे व तिरुवनंतपुरम याठिकाणी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा होईल. हे केंद्र वाढविण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार संस्थेस राहील. प्रवेश परीक्षा, समूहचर्चा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळण्यासाठी संस्था सहाय्य करील. परंतु संस्था नोकरीची हमी देत नाही. भारत सरकारच्या धोरणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षण उपलब्ध आहे.

या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2016 अशी आहे. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया www.nird.org.in/pgdrdm.aspx या संकेतस्थळास भेट द्यावी.

संपर्कासाठी पत्ता-
को-ऑर्डिनेटर (ॲडमिशन) सेंटर फॉर पीजी स्टडीज ॲण्ड डिस्टेंस एज्युकेशन (सीपीजीएस अॅण्ड डीई),
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायती राज,
राजेंद्रनगर, हैद्राबाद-500 030
दूरध्वनी क्र. 040-24008460/442/572
टेलीफॅक्स-040-24008522
मोबाईल-8499865285

केंद्रीय वखार महामंडळात 644 पदांसाठी भरती

केंद्रीय वखार महामंडळात 644 पदांसाठी भरती

भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारित केंद्रीय वखार महामंडळ आहे. कृषी उत्पादने तसेच कृषी मालांसाठी शास्त्रीय साठवण सुविधा पुरविणाऱ्या आणि आयात-निर्यात कार्गोसाठी एअर कार्गो संकुले, लॅण्ड कस्टम स्टेशन्स, सीएफएसज/आयसीडीज इ. सारखे पायाभूत सोयी सुविधांसह अन्य अधिसूचित ग्राहकोपयोगी चीजवस्तूंसाठी साठवण सुविधा पुरविणाऱ्या केंद्रीय वखार महामंडळ, शेड्युल-ए या मिनी रत्न, गट-I उद्योगातर्फे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सर्वसाधारण) - 37 पदे, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) - 06 पदे, सहाय्यक अभियंता (सिव्हिल) - 15 पदे, अकाऊंटंट (लेखापाल)- 18 पदे, अधीक्षक (सर्वसाधारण) - 130 पदे, कनिष्ठ अधीक्षक - 130 पदे, कनिष्ठ तांत्रिक साहाय्यक - 300 पदे, स्टेनोग्राफर - 08 पदे अशी पदे आहेत.

1) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सर्वसाधारण) - या पदासाठी उमेदवार हे पर्सोनल मॅनेजमेंट किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा इंडस्ट्रियल रिलेशन किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट किंवा सप्लाय चैन मॅनेजमेंट या विषयासह प्रथम श्रेणीत एमबीए झालेले असावेत.

2) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) - या पदासाठी उमेदवार हे इन्टोमोलॉजी किंवा मायक्रोबायलॉजी किंवा बायो-केमिस्ट्री या विषयासह प्रथम श्रेणीत कृषी विषयातील मास्टर पदवीधर असावेत. बायो-केमिस्ट्री किंवा इन्टोमोलॉजी हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत झुऑलॉजीतील मास्टर पदवीधर असावेत. ज्या उमेदवारांकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वेअरहाऊसिंग ॲण्ड कोल्ड चैन मॅनेजमेंट क्वॉलिटी मॅनेजमेंट ही पदवी असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल.

3) सहाय्यक अभियंता (सिव्हिल) - या पदासाठी उमेदवार हे सिव्हिल इंजिनियरिंगमधील पदवीधर असावेत.

4) अकाऊंटट (लेखापाल) - या पदासाठी उमेदवार हे बीकॉम किंवा बीए (कॉमर्स) किंवा चार्टड अकाऊंटंट किंवा कॉस्ट आणि वर्क अकाऊंटन्टस् किंवा इंडियन ऑडिट आणि अकाऊंटस् डिपार्टमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव असलेले एसएएस अकाऊंटन्टस् असावेत.

5) अधीक्षक (सर्वसाधारण) - या पदासाठी उमेदवार हे कुठल्याही विषयातील मास्टर पदवी धारण केलेले असावेत.

6) कनिष्ठ अधीक्षक - या पदासाठी उमेदवार हे कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत.

7) कनिष्ठ तांत्रिक साहाय्यक - या पदासाठी उमेदवार हे ॲग्रीकल्चर/झुऑलॉजी या विषयातील पदवीधर असावेत. झुऑलॉजी पदवीत त्यांनी केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्री हा एक विषय घेतलेला असावा.

8) स्टेनोग्राफर - या पदासाठी उमेदवार हे मॅट्रिक उत्तीर्ण व किमान 80 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

या पदांसाठी वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे. या पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. अन्य कोणत्याही माध्यमांद्वारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर, 2016 अशी आहे.

निवड प्रक्रिया, सर्वसाधारण माहिती, अर्हता व अनुभव यांसह पात्रता निकषांसंबंधी तपशिलवार माहितीसाठी तसेच पात्र उमदेवारांनी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणेमार्फत सीडब्ल्यूसीच्या www.cewacor.nic.in अथवा www.cwcjobs.com या संकेतस्थळांस भेट द्यावी अथवा क्यूआर कोड्स स्कॅन करावेत.

पत्ता -
केंद्रीय वखार महामंडळ,
(आघाडीची शेड्युल 'ए' मिनीरल भारत सरकारचा उपक्रम)
कॉर्पोरेट कार्यालय, 4/5, सिरी इन्स्टिट्यूशनल एरिया,
ऑगस्ट क्रांती मार्ग, हौझ खास,
नवी दिल्ली – 110016.

- देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)(प्रशासन)
 

भारत सरकारची शिष्यवृत्ती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी/मार्च 2016 मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक (इयत्ता बारावी) प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखांमधील उच्चतम गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांच्यातर्फे राबविण्यात येते. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी नवीन मंजुरीचे आणि प्रथम नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने व शिष्यवृत्तीच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ नुतनीकरणाचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

नवीन मंजुरीसाठी व प्रथम नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत आधारकार्ड असणे आवश्यक आहे व त्याचा आधार क्रमांक हा त्यांच्या बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. नवीन मंजुरीचा अर्ज करण्याच्या विस्तृत पद्धतीसाठी www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध जाहिरातींचे व सूचनांचे पालन करावे.

शिष्यवृत्तीच्या प्रथम ऑनलाईन नुतनीकरणासाठी विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीच्या ऑफलाईन नुतनीकरणासाठी मागील वर्षाच्या परिक्षत किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. द्वितीय, तृतीय व चतुर्थ नुतनीकरणसाठी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठीचा अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह महाविद्यालयाकडे दि. 20 ऑक्टोबर, 2016 पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. महाविद्यालयाने सदर अर्जाची छाननी करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र अर्ज दि. 30 ऑक्टोबर, 2016 पर्यंत संबंधित सहसंचालक कार्यालयाकडे जमा करावेत. संबंधित यादी उच्च शिक्षण संचालनालयास दि. 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत जमा करावी. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.

नवीन मंजुरी व प्रथम नुतनीकरणासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टिम पद्धतीने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर, 2016 अशी आहे.

योजनेची विस्तृत जाहिरात, नूतनीकरणाच्या प्रथम, द्वितीय आणि चतुर्थ ऑफलाईन अर्जाचा नमुना, मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय सह संचालक, उच्च शिक्षण किंवा संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे शिष्यवृत्ती विभाग यांचा दूरध्वनी क्रमांक 020-26126939 यावर संपर्क साधावा.