आय.बी.पी.एस. : क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये 16 हजार 560 पदांसाठी भरती

देशातील खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण 1969 साली करण्यात आले. या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आल्यानंतर सर्व बँकांमध्ये योग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भरती करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी, योग्य उमेदवारांची निवड व्हावी, उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता समान राहावी यासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड संस्था असण्याची गरज भासू लागली. त्यामुळे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट या संस्थेत विशेष शाखा उघडण्यात आली.

1984 साली या शाखेचे रुपांतर ''इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन'' या स्वतंत्र संस्थेत करण्यात आले. ही संस्था स्वायत्त असून इंडियन बँक असोसिएशन या संस्थेची सदस्य आहे. एसएनडीटी विद्यापीठाने या संस्थेला व्यवस्थापन क्षेत्रात पीएचडी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापक, विभाग प्रमुखांना पीएचडी गाईडचा दर्जा देण्यात आला आहे. स्थापनेपासून देशातील राष्ट्रीकृत बँकांमध्ये भरती करण्याची मोठी जबाबदारी ही संस्था सक्षमपणे पार पाडीत आहे.

संस्थेने नुकतीच क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या गट अ - अधिकारी आणि गट ब - कार्यालय सहायक या पदांच्या भरतीसाठी घोषणा केली आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2016 मध्ये परीक्षा घेण्यात येईल.

या परीक्षेद्वारे 16 हजार 560 जागांसाठी भरती करण्यात येईल. यामध्ये ऑफिसर असिस्टंट (मल्टीपर्पज) या पदासाठी 8 हजार 824 जागा, ऑफिसर्स स्केल I या पदासाठी 5 हजार 539 जागा, ऑफिसर्स स्केल II (ॲग्रीकल्चर) या पदासाठी 152 जागा, मार्केटिंग ऑफिसर्स या पदासाठी 75 जागा, ट्रेजरी मॅनेजर या पदासाठी 19 जागा, लॉ ऑफिसर्स या पदासाठी 55 जागा, चार्टर्ड अकाऊंटंट ऑफिसर्स या पदासाठी 35 जागा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर्स या पदासाठी 130 जागा, जनरल बँकिंग ऑफिसर या पदासाठी 1 हजार 533 जागा आणि ऑफिसर्स स्केल III मध्ये 198 जागा उपलब्ध आहेत.

ऑफिसर असिस्टंट (मल्टीपर्पज) या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षादरम्यान, ऑफिसर स्केल I या पदासाठी 18 ते 30 वर्षादरम्यान, ऑफिसर्स स्केल II या पदासाठी 21 ते 32 या वर्षादरम्यान, ऑफिसर्स स्केल III या पदासाठी 18 ते 40 वर्षादरम्यान असावे. या पदांसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 01 नोव्हेंबर, 2016 रोजीची धरण्यात येईल. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी 5 वर्षे, इतर मागासवर्ग उमेदवारांसाठी 3 वर्षे तर दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांपर्यंत वयोमर्यादा शिथिलक्षम आहे.

ऑफिसर असिस्टंट (मल्टीपर्पज), ऑफिसर स्केल I, ऑफिसर्स स्केल II (जनरल बँकिंग ऑफिसर) या पदासाठी उमेदवार कुठल्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असावेत. ऑफिसर्स स्केल II (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर्स) या पदासाठी उमेदवार हे इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा समकक्ष विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असावेत. ऑफिसर्स स्केल II (ॲग्रीकल्चर) या पदासाठी उमेदवार हे ॲग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर/डेअरी/ॲनिमल हसबन्ड्री/फॉरेस्ट्री/वेटरनरी सायन्स/ॲग्रीकल्चर इंजिनियरिंग/ फिसीकल्चर या विषयातील पदवीधर असावेत.

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30 सप्टेंबर, 2016 पर्यंत भरावयाचे आहेत.

अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया संस्थेच्या www.ibps.in या संकेतस्थळास भेट द्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी सविस्तर अधिसूचना वाचावी आणि त्यात नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे.

No comments:

Post a Comment