इंडियन ऑईलमध्ये विविध अभियत्यांना संधी

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ही भारतातील या क्षेत्रातील सर्वात मोठी व्यावसायिक यंत्रणा आहे. इंडियन ऑईलची आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 3 लाख 99 हजार 601 कोटी एवढी उलाढाल होती. इंडियन ऑईलने गेल्या आर्थिक वर्षात 10 हजार 399 कोटी एवढा नफा मिळविलेला आहे.

जगातील प्रतिष्ठेच्या अशा ग्लोबल 500 यादीत इंडियन ऑईलचा क्रमांक 161 वा तर भारतात पहिला आहे. इंडियन ऑईलमध्ये सध्या जवळपास 33 हजार अभियंते, अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.

गेल्या 5 दशकांपासून देशाची इंधनाची गरज इंडियन ऑईल भागवित आहे. देशात जवळपास 45 हजार ग्राहक सेवाकेंद्रांमार्फत इंडियन ऑईल ग्राहकांना सेवा देत आहे. यामध्ये 25 हजाराहून अधिक पेट्रोल व डिझेल पंप, 6 हजार 200 किसान सेवा केंद्रे आहेत. देशातील 55 शहरांमध्ये 9 हजार 400 पेट्रोल पंप पूर्णपणे स्वयंचलित झाले आहेत. इंडियन ऑईलमध्ये सेवा करणे हे केवळ आर्थिकदृष्ट्याच फायदेशीर नसून अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.

इंडियन ऑईलने नुकतीच सिव्हिल, केमिकल, इलेक्ट्रिकल, मेटालॉर्जी, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेन्टेशन, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड आयटी, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, पॉलमर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग या विषयातील अभियांत्रिकी पदवीधरांकडून इंजिनियर्स/ऑफिसर्स या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांची भरती उमेदवारांची समूहचर्चा, व्यक्तिगत मुलाखत आणि त्यांच्या गेट 2017 च्या गुणांकनाच्या आधारावर करण्यात येईल. या पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 26 वर्षापर्यंत असावे. इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादा शिथीलक्षम आहे. उमेदवारांची वयोमर्यादा दि. 30 जून, 2017 रोजी गणली जाईल.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद किंवा युनिवर्सिटी ग्रॅण्ट कमिशनमार्फत मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बीटेक/ बीई पदवी किंवा समकक्ष पदवी धारण केलेली असावी. ही पदवी संबंधित विषयातील असावी. पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान पदवी परीक्षेत 65 टक्के तर राखीव संवर्गातील उमेदवारांना किमान 55 टक्के गुण मिळालेले असावेत.

उमेदवारांनी गेट 2017 च्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावयाचे आहेत. गेटसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर, 2016 अशी आहे. गेट परीक्षेसाठी त्यांना दि. 05 जानेवारी, 2017 पर्यंत प्रवेश पत्र मिळेल. त्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 फेब्रुवारी, 2017 अशी आहे. गेट परीक्षेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी http://www.iitr.ac.in/gate या किंवा आयआयटीएस मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर आणि मद्रास तसेच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बँगलोर या संस्थेच्या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या www.iocl.com या संकेतस्थळास भेट द्यावी.

No comments:

Post a Comment